मुंबई - जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर ज्या रुग्णांची दृष्टी कायमची गेली, त्या रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात अंधार पसरला आहे. दृष्टी गमावलेल्यांमध्ये दोघेजण चालक होते, त्यांची रोजीरोटी गेली. रुग्णालयाच्या चकरा मारणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनाही नोकरीवरुन काढण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. न्याय मिळाला नाही, तर एकत्र येऊन आंदोलन करण्याचा इशारा नातेवाईकांना दिला आहे.
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर गौतम गवाणे (४४) यांची दृष्टी गेली. शस्त्रक्रियेनंतर ट्रॉमा केअर सेंटरमधून त्यांना केईमला दाखल करण्यात आले. डोळा काढून टाकला नाही, तर संसर्ग वाढत जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. केईम रुग्णालयातून घरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा तोल जाऊ लागला. डॉक्टर संसर्ग मेंदूपर्यंत, शरीरात सर्वत्र पसरल्याचे सांगत आहेत. गेले २ महिने पतीच्या उपचारासाठी वेळ दिल्यामुळे गौतम यांच्या पत्नी कविता यांना कामावरून कमी करण्यात आले. यामुळे २ मुलांच्या शिक्षणाचा खर्च, नवऱ्याच्या रिक्षासाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न कविता यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यात औषधांचा खर्च कसा झेलणार याने त्या चिंताग्रस्त झाल्या.