नागपूर - कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून त्याचा काळाबाजार करणारी एक परिचारिका आणि तिच्या प्रियकराला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती अजित असे अटक करण्यात आलेल्या परिचारिकेचे नाव असून शुभम अर्जुनवार असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. वाठोडा पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
उपराजधानी नागपूर मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना अटक केली आहे. यामध्ये डॉक्टर, वॉर्ड बॉयसह वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्यात काळाबाजार करणाऱ्यांचा सुळसुळाट असल्याने पोलिसांनी त्या अनुषंगाने कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान ज्योती नामक महिला परिचारिका या कामात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.