नागपुर- राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ नागपूरात भारतीय जनता पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विकास कामांना थांबण्याच्या आदेशाची होळी करण्यात आली. नागपुर शहरातील व्हेरायटी चौकात निषेध सभा घेण्यात आली. या सभेला भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजप आक्रमक
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ नागपूरात भारतीय जनता पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
सरकार जाणीवपूर्वक विकास कामांना स्थगिती देऊन राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ही स्थगिती मागे न घेतल्यास सोमवार पासून हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात असलेल्या सरकारची अडवणूक करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शहर व ग्रामीण भागातील विकासकामांना स्थगिती देण्याचे जे धोरण अवलंबिले आहे, त्याचा विरोध करण्यात आला. यावेळी विकासकामांना स्थगिती देणाऱ्या जीआरची होळी देखील करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहराच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला, असताना हा प्रकार विकासाला खीळ घालणारा असल्याचा आरोप यावेळी भाजपने केला.