नागपूर- दिवाळी बोनस न मिळाल्याने संतप्त झालेल्या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीला अंधार होईल का अशी शक्यता निर्माण झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा मंत्रालयाच्या कामकाजावर टीका केली आहे. हे सरकार निष्क्रीय असून त्यांना कर्मचाऱ्यांसाठी काहीही करायचे नसल्याची टीका करत त्यांनी वीज कंपन्याच्या कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा दिला आहे.
तसेच ग्राहकांचे वाढीव वीज बिल कमी करणे असो, की शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणे असो, यापैकी या सरकारला काहीच द्यायचे नाही, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा मंत्रालयावर केला आहे.
माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोनस देणे अशक्य, उर्जा मंत्रालयाची भूमिका-
राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी संप लायटिंग स्ट्राईक करण्याचा इशारा दिला आहे. बोनस आणि पगरवाढीचा दुसरा हप्ता देण्यात यावा, अशी मागणी वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सध्या बोनस देणे शक्य नसल्याचे म्हंटल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे ऊर्जा मंत्रालय कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याची भूमिका घेत असेल तर दिवाळीच्या दिवशी लायटिंग स्ट्राईक करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
हे सरकार हुकुमशाही पद्धतीने चालते-
या संपात महावितरण, महाजेनको व महापारेषण या वीज कंपन्यातील ८६ हजार अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सरकार हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालविल जात असल्याची टीका केली आहे. तसेच त्यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, दिवाळी बोनसचा निर्णय ८ दिवस अगोदर घेणे अपेक्षित असते, मात्र ज्या कर्मचाऱ्यांना बोनस अनुदेय असताना देखील सरकार बोनस न देता कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. या पूर्वी असे कधीही घडलं नसल्याचा दाखलसुद्धा बावनकुळे यांनी यावेळी दिला.
दिवाळी अंधारात तर जाणार नाही?
वीज कंपनीत काम करणाऱ्या १६ संघटनांनी याआधी व्यवस्थापना सोबत या विषयावर चर्चा करून निवेदन सादर केलेली आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघू न शकल्याने संघटनांनी दिवाळीच्या दिवशीच लायटिंग स्ट्राईकचा इशारा दिला आहे. त्यामुळे ही दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.