नागपूर Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जी पावलं उचलली, त्यास भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असं मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. आज नागपूर विमानतळावर ते बोलत होते. कालच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं की, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, यासाठी भाजपा पूर्ण सहकार्य सरकारला करेल अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे-जे सरकारला करावं लागेल ते सरकारने करावं, त्याला संपूर्ण समर्थन भारतीय जनता पक्ष देईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या परिस्थितीला उध्दव ठाकरे जबाबदार: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या चुकीमुळे महाराष्ट्राला आज हे दिवस पाहावे लागत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातला जो काही घोळ निर्माण झाला आहे, जे परिणाम महाराष्ट्र भोगत आहे, या परिस्थितीला जबाबदार केवळ उद्धव ठाकरेच आहेत असा आरोप, बावनकुळे यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांना आता बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडता आली असती. मात्र तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही असा आरोप त्यांनी केलाय.