नागपूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांच्या या दौऱ्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. तर राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत म्हणजे २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत, हे मी अनेक वेळेला बोललेलो आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आणखी एक मोठा भूकंप राज्यात होईल. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, पुढचा भूकंप हा काँग्रेस पक्षात होणार आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही कुठेही भूकंप घडवणार नाही. मात्र, काँग्रेस पक्षातून कोणी भाजपमध्ये येणार असेल तर, त्यांच्यासाठी भाजपचे दुपट्टे तयार आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची स्मृती गेली: उद्धव ठाकरे यांची स्मृती गेल्यासारखी दिसत आहे. जनतेने २०१९ मध्ये मतपेटीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे असा कौल दिला होता. मात्र, तुम्ही तेव्हा बेईमानी केली. जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर न येऊ देता, तुम्ही शरद पवार यांच्यासोबत कट करून सत्तेवर आला. उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर कोर्ट योग्य निर्णय घेईलच, मात्र विधानसभा अध्यक्ष कारवाई करत आहेत.
शरद पवारांच्या कटाला उद्धव ठाकरेंची साथ: उद्धव ठाकरे राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आईवडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत. राजकारणात त्यांचा स्तर किती खाली जाऊ शकतो हे दिसून येत आहेत. अमित शाह जे बोलतात ते करतात. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना एका भावासारखे सांभाळले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवारांच्या कटाला साथ द्यायची होती तिथे त्यांनी साथ दिली.