नागपूर -महावितरण कंपनीतील विविध रिक्त पदांवरील नियुक्त्या अजूनही रखडलेल्या आहेत. ती पदे तात्काळ भरण्याच्या मागणीसाठी भाजपाने आज काळी टोपी व दुपट्टा घालून निषेध करण्यात आला. शहरातील संविधान चौकात हे आंदोलन करत यावेळी महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या नियुक्त्या महाराष्ट्र सरकारने मुद्दाम थांबवल्याचा आरोपही यावेळी बावनकुळे यांनी केला.
राज्य सरकार इतके निष्क्रिय का?
महावितरणमधे 5000 हजार विद्युत सहाय्यक, 2000 हजार उपसहाय्यक आणि 412 शाखा अभियंता अशा पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण होऊनही महाराष्ट्र सरकारने ती पदे अजूनही भरली नाहीत. ही पदे भरण्यासाठी इतका उशीर का ? असा सवाल माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून महावितरण कंपनीला पदभरतीबाबत कोणतेही मार्गदर्शन मिळत नसल्याने या नियुक्त्या रखडल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.