नागपूर:१६ एप्रिल रोजी नागपुरात आयोजित होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी पूर्व नागपूर भागातील दर्शन कॉलनीचे मैदान देण्यास भाजपने विरोध केला आहे. हे मैदान खेळांसाठी राखीव असल्याने राजकीय सभेसाठी हे मैदान देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. तर ज्या अटींवर या मैदानाची परवानगी देण्यात आली आहे, त्या अटी पूर्ण करून याच मैदानावर महाविकास आघाडीची सभा होईल, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे.
16 एप्रिलला नागपुरात वज्रमुठ सभा: या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी दर्शन कॉलनी परिसरातील मैदान निश्चित करण्यात आले असून, नागपूर सुधार प्रन्यासने मैदानाची परवानगी देखील दिली आहे. आता नागपूर सुधार प्रन्यासने दिलेल्या परवानगीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. ही परवानगी रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे. यासंबंधीचे पत्र भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी लिहिले आहे.
कृष्णा खोपडेच्या मतदारसंघातील मैदान:महाविकास आघाडीची सभा असलेले मैदान हे कृष्णा खोपडे यांच्या मतदार संघात येत. महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांची सभा मतदार संघात झाल्यास त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच कारणामुळे कृष्णा खोपडे सक्रिय झाल्याची कुजबुज आहे. एकूणच सभेला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केल्यावर, आता नागपूर सुधार प्रन्यास काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.