नागपूर- प्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत जावेद अख्तर यांनी किमान एक महिना अफगाणिस्तानात जाऊन तालिबान्यांसोबत रहावे, अशी खोचक टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बोलताना भाजप नेते बावनकुळे संस्कारमय व्यक्ती तयार करण्याचे विद्यापीठ म्हणजे आरएसएस
जावेद अख्तर यांच्याबद्दल आदर होते. पण, त्यांनी आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या संघटनांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध बावनकुळे यांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले, अख्तर यांना संघाचा इतिहास माहिती नाही. संघाने दिन दुबळ्यांसाठी काम केले आहे. देशाच्या हितासाठी समाजातील शेवटच्या दिनदुबळ्या घटकांच्या हितासाठी कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे. देश हितासाठी जे मन्युष्यबळ लागते यासाठी संस्कारमय व्यक्ती तयार करण्याचे करणारे विद्यापीठ म्हणजे संघ आहे.
वादग्रस्त शब्द परत घ्यावे
देशात एखादा लिखाण करणाऱ्या व्यक्तीने वक्तव्य करावे आणि ते लोकांनी मान्य करावे, असे होणार नाही. एकतर जावेद अख्तर यांनी ते वक्तव्य परत घ्यावे अन्यथा त्यांनी अफगाणिस्तानला एक महिना राहून यावे, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.
काय म्हणाले होते जावेद अख्तर...
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तिथल्या घडामोडींवर लागून आहे. अफगाणिस्तान शेजारी राष्ट्र असल्याने भारताची चिंता देखील वाढली आहे. तालिबान दहशतवादाला खतपाणी देत असल्याचा पूर्व इतिहास असल्याने भारताची प्रत्येक घडामोडींवर नजर आहे. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानवर परखड मत मांडले. तालिबानी रानटी आणि मध्ययुगीन मानसिकता असलेली लोक आहेत, असे ते म्हणाले. तसेच अख्तर यांनी तालिबानची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत केली आहे. तालिबानचा जो उद्देश आहे. तोच आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दलासारख्या संघटनांचा आहे. भारतीय संविधान त्यांच्या मार्गात अढथळा निर्माण करत आहे. मात्र, संधी भेटली तर ती सीमाही हे पार करतील, असे जावेद अख्तर यांनी म्हटले होते.
हेह वाचा -उत्तर भारतीयांच्या आरक्षणाची मागणी म्हणजे काँग्रेसचा स्टंट - भाजप नेते बावनकुळे