नागपूर - गुलाब चक्रीवादळामुळे विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळ आणि पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे तत्काळ ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करून हेक्टरी 25 हजार मदत देण्याची मागणी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच येत्या तीन दिवसात मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून मदत द्यावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते.
भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे
'ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करा'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत अनेक आश्वासन दिले पण पूर्ण केले नाही, असा आरोप करत आताच्या या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मदत करा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे. पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात मोठे नुकसान झाले आहे. सरकार नुकसानीचे सर्वेक्षण करायला तयार नाही. ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण सुरू करून मदतीची घोषणा करायला पाहिजे होती. पण पालकमंत्री आप आपल्या गावात खुश असून जिल्ह्यातील परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांना जिल्ह्याचे काही देणे घेणे नाही, असा घणाघात त्यांनी मंत्र्यांवर केला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. विदर्भाच्या काही जिल्ह्यात आणि मराठवाड्यात ढगफुटी सारखा पाऊस बरसला आहे. यात शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनच्या शेतात पावसाचे पाणी साचले पीक सडण्याच्या मार्गावर आहे. हीच अवस्था संत्रा आणि भाजीपाला पिकांची झाली आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -Maharashtra Rain : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो धीर सोडू नका.. सरकार तुमच्या पाठिशी, आपत्तीतून बाहेर काढू - मुख्यमंत्री