नागपूर - 'शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजपने केली आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. पुस्तकाचे लेखक डॉ. विनोद अनाव्रत आणि पुस्तकाचे प्रकाशक पुण्याच्या सुगावा प्रकाशन संस्थेच्या मालकाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. या संदर्भांत भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सोमवारी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर, कुलकर्णी यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भांत माहिती दिली.
'शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव' असे पुस्तकाचे शीर्षक असून यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह, अपमानजनक आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. या पुस्तकात लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असून लेखक महाराजांबद्दल तुच्छभाव दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कुलकर्णी यांनी केला आहे. एवढंच नाही तर पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणाचे शीर्षक शिवाजीच्या महानतेचा बागुलबुवा असा आहे. तर शिवाजीचा फुगा कुणी व का फुगवला असे उपप्रकरणसुद्धा या पुस्तकात असल्याचे कुलकर्णी म्हणाले आहेत.