नागपूर- मौदा तालुक्यातील अनेक गावांना कन्हान नदीच्या पुराचा फटका अनेक गावांचा बसला आहे. पुराचे पाणी गावांमध्ये शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आणि शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. राज्य शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांनी आज पूरग्रस्त मौदा तालुक्याचा दौरा केला.
मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्यामुळे चौराई धरणातून सात हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पेंच व तोतलाडोह धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे कन्हान नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे तालुक्यातील मौदा, चेहडी, झुल्लर, किरणापूर,वढणा, सिंगोरी,मोहखेडी, माथनी या गावांना पुराचा तडाखा बसला आहे. शेकडो घरे पाण्याखाली गेले आहेत. चेहडी, वढणा व मौद्यातील काही नागरिकांना तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या नेतृत्वात एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. तालुक्यातील तारसा, निमखेडासह कामठी तालुक्यातील भामेवाडा, जखेगाव, चिकना गावांचा संपर्क तुटला आहे.