नागपूर Bawankule On Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केल्यामुळे काँग्रेस नेते संतापले आहेत. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का, असा सवाल उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना डिवचलं होतं. नाना पटोलेंच्या या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी काय केलं, या एका विषयावर नाना पटोले यांनी माझ्यासोबत खुली चर्चा करावी, असं आव्हानही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
काँग्रेसच्या काळात देशात दहशतवादी घटना :स्वातंत्र्यनंतरच्या काळापासूनचा इतिहास बघितला तर काँग्रेसच्या काळातचं देशात दहशतवादी घटना घडण्यास सुरुवात झाल्याचा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कसाब येऊन मुंबईत बॉम्बस्फोट करू शकला, एवढी हिम्मत शेजारी देशाची झाली होती. मात्र, आज सर्व देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिमान वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात ज्यांनी देशाविरुद्ध षडयंत्र केलं, त्यांच्या घरात घुसून मारण्याची हिम्मत भारतात आहे, हे दाखवलं असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजपा :पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत. भाजपासाठी त्यांनी काम केलं आहे. भाजपा त्यांच्या मागं आहे, त्या वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना दिली. पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपा आहे. पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या बद्दल अफवा पसरवू नये, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेवटी तपास यंत्रणा चौकशी करतात, त्यानंतर निर्णय घेतात, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.