नागपूर - गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चोरीला गेलेले आठ महिन्यांचे बाळं नागपूर पोलिसांनी ( Baby kidnapped in Nagpur ) अवघ्या पाच तासात शोधून आईच्या स्वाधीन ( Baby rescue from kidnapping ) केले आहे. अपहरणाची ही घटना शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण ( An eight-month-old baby was kidnapped in Nagpur ) झाले अशी तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपींना अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये फरजान उर्फ असार कुरेशी, सिमा परवीन अब्दुल रूउफ असारी, बादल धनराज मडके, सचिन रमेश पाटील यांचा समावेश आहे. तर, मुख्य आरोपी योगेंद्र, त्याची पत्नी रिटा प्रजापती पळून गेले आहेत.
बाळ चोरीला गेल्याची तक्रार -या प्रकरणातील फिर्यादी म्हणजे बाळाची आई राजकुमारी राजु निषाद चिखली झोपडपट्टी या भागात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरा शेजारी आरोपी योगेंद्र, त्याची पत्नी रिटा प्रजापती राहायला आले होते. घर अगदी शेजारी असल्याने एकमेकांच्या घरी ये-जा सुरु होती. आरोपी हा फिर्यादीचे घरी जावुन आठ महिन्याच्या बाळासोबत खेळत असे. आरोपी रोज प्रमाणे काल दुपारी फिर्यादीचे घरी गेला. बाळाला बाजुच्या दुकानात खाउ घेवुन देतो असे सांगून घेऊन गेला. तास-दोन तास झाले तरी, आरोपी योगेंद्र, त्याची पत्नी रिटा प्रजापती परत आले नाही. तेव्हा बाळाच्या आईने शोधा-शोध सुरू केला. मात्र, त्यांचा कुठे पत्ता लागत नसल्याने अखेर रात्री उशिरा 10 वाजताच्या सुमारास बाळ चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.