नागपूर- सर्व शिक्षा अभियानाचा मोठा गाजा-वाजा सुरु असताना देखील हजारो विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाचे खासगीकरण जोरात सुरु असताना शासनाच्या शाळा त्याच वेगात बंद होत आहे. त्यामुळे गोर-गरीब विद्यार्थी शाळेचा उंबरठा देखील चढू शकत नसल्याचे भयाण वास्तव आज राज्याच्या प्रत्येक शहरात दिसून येत आहे. अशातच शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा वसा नागपुरातील बबिता मोटघरे यांनी घेतला आहे. सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांच्यामार्फत रस्त्यांवर भटकंती करणाऱ्या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे.
बबिता मोटघरे या शिक्षण क्षेत्रात कार्यरत नसून त्या एका मोठ्या कंपनीत एच.आर हेड आहेत. सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून कॉलेजपर्यंत पोहचले आहेत. दिवसभर कार्यालयीन काम आटोपल्यानंतर त्या थेट घरी न जाता महाराजबाग मार्गावरील फुटपाथ गाठतात आणि तेथे आपली शाळा भरवतात. बबिता यांचे विद्यार्थीदेखील खास आहेत. त्यांच्या शाळेत फुलझाड आणि लहानमुलांची खेळणी विकणारी मुले येतात. त्यांच्या सहवासात बबिता इतक्या रमतात की त्यांना वेळेचे देखील भान राहत नाही. त्याचबरोबर विद्यार्थी देखील बबिता यांच्या सानिध्यात पुस्तकांमध्ये रमून जातात.