नागपूर -कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत, या विषयांवर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात जाऊन पथनाट्य सादर करत लोकांमध्ये लसीकरणाबद्दल जणजागृती केली जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी हेही वाचा -नागपूर : अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थी फुटपाथवर
कुठे आणि काय असणार हा उपक्रम..
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये १६ व्हॅनद्वारे फिरते कला पथकांच्या माध्यमातून लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे, लसीकरण मोहिमेची माहिती नाट्यातून मांडली जाणार आहे. क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरच्यावतीने नागपूर जिल्ह्यात तालुका स्तरावर ग्रामीण भागात १० दिवस प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
रथाच्या माध्यमातून लोकांमध्ये पोहचवणार योजनेची माहिती..
या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती पोहचविण्यात येणार आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांवर लक्ष न ठेवता जनजागृती करणे, तसेच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या रथामधून दिली जाणार आहे.
पथ नाट्यातून होणार सादरीकरण..
प्रसिद्ध रंगधून कलामंच, नागपूर आणि त्यांच्या चमूचे सदस्य हे नागरिकांचे लक्ष वेधून घेणार आहे. समाजातील नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन करणे, अफवांमुळे निर्माण झालेले प्रश्न, या पथनाट्यातून दूर करण्यात येणार आहे. या उपक्रमाला जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोरोनाची लसीकरण मोहीम, तसेच आत्मनिर्भर भारत या विषयावर जनजागृती केली जाणार आहे. यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे सहाय्यक संचालक निखील देशमुख, पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक शशीन राय, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा -मिनी लॉकडाऊनच्या दिवशीही नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; १० जणांचा मृत्यू