नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात नागपूर महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २६ टक्क्यांनी वाढ झाली असून, यंदाच्या तीनही शाखा मिळून निकालाची टक्केवारी ८८.०८ इतकी आहे.
जाहीर झालेल्या निकालानुसार मनपाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.७० इतकी आहे. कला शाखेच्या निकालाची टक्केवारी ८८.०६ तर वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ७३.७७ इतकी आहे. तीनही शाखांमध्ये एकूण २६३ विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यापैकी २६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून एम. ए. के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मनताशाह परवीन हिने ६५० पैकी ४७५ (७३.०८%) गुण प्राप्त करीत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.