नागपूर -कोरोना संकटाच्या काळात नागपूर शहरामध्ये समाजसेवेचे व्रत घेतलेली अशी अनेक माणसं पुढे येत आहेत, ज्यामुळे अजूनही माणुसकी शिल्लक आहे यावर विश्वास कायम ठेवण्याचं धाडस नागपूरकर करत आहेत. अन्यथा या कठीण काळात सुरू असलेली लूट माणुसकीला मान शरमेने खाली घालायला लावत आहे. एकीकडे नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना या विपरीत परिस्थितीत रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून एका ऑटो चालकाने चक्क ऑटोरिक्षात ऑक्सीजन सिलिंडर बसवून घेतले आहे. कोरोनामुळे रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून हा ऑटो चालक ही सेवा अगदी निशुल्क देतो आहे. आनंद वर्धेवार असं या समाजसेवी ऑटोचालकचे नाव आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्याने रुग्णासाठी ही सेवा सुरू केली आहे.
ऑटोरिक्षातच बसवले प्राणवायू सिलेंडर -
एकीकडे प्राणवायूसाठी धावाधाव होत असताना आनंद वर्धेवार कोरोना रुग्णांसाठी प्राणवायू-दूत ठरले आहेत. ऑटोचालक आनंद वर्धेवार यांचं पूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झालं होतं. त्या वेळेस त्यांना प्राणवायू मिळविण्याकरिता जो त्रास त्यांना झाला तो त्रास इतर रुग्णांना होऊ नये म्हणून त्यांनी ऑटोरिक्षातच प्राणवायू (ऑक्सिजन) सिलिंडर बसवून घेतलं आहे.
कोरोना रुग्णांची निःशुल्क सेवा -
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णाला प्राणवायू उपलब्ध व्हावा या करीता नातेवाईकांची होणारी धावाधाव ऑटोचालक आनंद वर्धेवार यांनी अगदी जवळून अनुभवली आहे. जेव्हा पैसे मोजून सुद्धा प्राणवायू मिळत नाही. त्यावेळी रुग्णाची आणि कुटुंबियांची काय अवस्था याची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच सर्वत्र रुग्णांची लूट सुरू असताना आनंद वर्धेवार विपरीत परिस्थितीत कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. गरीब रुग्णांना ते ऑटोरिक्षातून रूग्णालय निःशुल्क घेऊन जातो. गरज असेल तर प्राणवायू लावतात.