नागपूर -अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी व सासूवर बॅटने हल्ला केल्याची घटना नागपुरात घडली आहे. यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातील मानकापूर परिसरातील कृष्णनगर या भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी दिलीप बुकणे याला अटक करण्यात आली आहे. फक्त संशयावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी व सासूवर हल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नोकरीच्या ठिकाणी पत्नीचे अनैतिक संबंध आहेत या संशयावरून पत्नी व सासूवर बॅटने हल्ला केल्याची घटना नागपुरात घडली.
आरोपी दिलीप बुकणे याचा खासगी व्यवसाय होता; परंतु लॉकडाऊनमुळे हा व्यवसायही बंद झाल्याने त्याची मनस्थिती बिघडली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून तो घरात असभ्य वर्तन करत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी आरोपी दिलीप बुकणे याला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. जखमी पत्नी ही वडिलांच्या जागी नोकरीवर रूजु झाली होती; परंतु आरोपीच्या वारंवार गैरवर्तनामुळे ती काही दिवसांपासून आपल्या आईकडे राहण्यासाठी आहे. काल मध्यरात्री अशाच शुल्लक कारणावरून हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शिवाय आरोपीला १८ वर्षाचा मुलगा आहे. तोही त्याच्या वागणुकीमुळे त्रस्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास मानकापूर पोलीस करत आहे.