नागपूर CM Eknath Shinde : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देताना प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत (Assembly Winter Session २०२३) केली. गेल्या दीड वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची मदत केली असून, राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं.
कांद्याची महाबँक स्थापन :राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात येणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'मध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र, सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने ६ लाख ५६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले. ६.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत १४ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे ५ हजार १९० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कांद्याची महाबँक : महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत असून, न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गालगत १३ कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू असून कांदा निर्यातबंदीबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन : महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय असून, एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली तरी ती दुख:द असते, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल, अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचं नुकसान होणार नाही, असं शेतीचं मॉडेल कसं विकसित करता येईल, यासाठी हा टास्क फोर्स काम करणार आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटनाला चालना देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याबाबतही हा टास्क फोर्स काम करील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.