नागपूर Assembly Winter Session 2023 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपराजधानी नागपुरात आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळं राज्यातील दिग्गज नेत्यांनी नागपुरात तळ ठोकला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी आत्महत्या, दुष्काळ बेरोजगारी, महागाई, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा तिढा, या विषयावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला घेरलं. विरोधकांनी आक्रमक होत गळ्यात संत्र्यांच्या माळा घालून विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करुन विधिमंडळ दणाणून सोडलं.
कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चांगलेच आक्रमक झाले. त्यासाठी विरोधकांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर मोर्चा काढल्यानं विरोधकांनी आपले मनसुबे दाखवून दिले आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी आंदोलन सुरू केलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आदी सगळ्याच विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं आहे. यावेळी विरोधकांनी गळ्यात संत्र्यांची माळा घालून विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते बसणार एकाच कार्यालयात :शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंड केल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटाच्या आमदारांना वेगळं दालन देण्यात आलेलं नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आणि शरद पवार यांच्या गटातील आमदार एकाच दालनात बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.