नागपूर :Asian Games २०२३ :जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस प्रवीण देवतळेनं आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिरंदाजी मिश्र दुहेरी अर्चरी प्रकारात गोल्ड मेडल जिंकून नागपूरच्या शिरपेचात आणखी मनाचा तुरा रोवला आहे. काल चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात ओजस देवतळेने उपांत्य फेरीत कोरियाच्या तिरंदाजाचा 150 ते 146 गुणांनी पराभव करून पदक मिळवले.
शनिवारी होणार अंतिम सामना :ओजस देवतळे शनिवारी सुवर्णपदकाचा वेध करणार आहेत. ओजसची निर्णायक लढत आता अभिषेक वर्माशी असेल. अभिषेक हा भारतीय खेळाडू असल्यानं भारताला दोन पदके मिळण्याची खात्री आहे. ओजस आणि संपूर्ण नागपूरकर क्रीडाप्रेमींसाठी शनिवार हा ऐतिहासिक दिवस असणार आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी घेतली झेप : गेल्याचं महिन्यात बर्लिन इथं पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत नागपूरच्या ओजस देवतळे या प्रतिभावान खेळाडूनं सुवर्ण पदकाचा वेध घेत स्पर्धा गाजवली होती. ओजसच्या सुवर्ण कामगिरीमुळं जागतिक तिरंदाजी क्रमवारीत त्यानं अव्वलस्थानी झेप घेतल्यानं नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक कामगिरी करणारा ओजस पहिला भारतीय तिरंदाज ठरला होता.