नागपूर :वर्धा शहरातील सर्कस मैदानावर 17 वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटना दरम्यान एकनाथ शिंदेची वेशभूषा साकारून अवतरलेल्या कार्यकर्त्यांनी मंचावर उपस्थितीतसह सर्वांचे लक्ष वेधले. सतरावे अखिल भारतीय मराठी विद्रोही साहित्य संमेलन होत असताना एक अनुयायी म्हणून विद्रोही भूमिका साकारण्यासाठी येथे आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
एकाच वेळी दोन साहित्य संंमेलन : एकीकडे वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर ९६ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनात सुरू आहे. काही अंतरावर सर्कस मैदानावर 17 वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन रंगले आहे. एकाच वेळी दोन साहित्य संमेलन सुरू असल्याने वर्धेकरांसाठी साहित्याची मेजवानी ठरली आहे.
५० खोक्यांचे राजकारण मान्य नाही :सध्या महाराष्ट्र सरकारची सर्वसामान्य विरोधातील भूमिका आहे ती बदलली पाहिजे. ५० खोक्यांचे जे राजकारण तयार झाले याच्याशी सहमत नाही. विचार बदलला पाहिजे. पीडित, शोषित, वंचित जनतेला न्याय दिला पाहिजे. यासाठी ही वेशभूषा केली आहे. वैयक्तिक विरोध नाही; पण आंदोलक कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडली आहे, असे एकनाथ शिंदे यांची वेशभूषा केलेल्या महेंद्र मुनेश्वर यांनी सांगितले.
मराठी साहित्यिक अपयशी ठरले :सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास उलगडताना डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांवरही काही आक्षेप घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यावर विशेष असा प्रकाश मराठी साहित्यिकांकडून टाकण्यात आलेला नाही. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात विविध विचारक, वेगवेगळे सेनापती इथे घडले. मात्र, या महाभारताचा वेध घेण्यात मराठी साहित्यिक अपयशी ठरले, असे डॉ. अभय बंग म्हणाले. महाष्ट्रातील ज्ञानोबा, तुकोबा, विनोबा हे सर्वकालिक महान साहित्यिक घडले. साहित्यिकांसाठी आनंदी, देहू आणि वर्धा हे साहित्य पंढरी व्हावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आजची शिक्षण पद्धती म्हणजे शोकांतिका :आजच्या शिक्षण पद्धती इतकी मोठी शोकांतिका नाही. शेती नंतरची सगळ्यात मोठी इंडस्ट्री शिक्षणाची आहे. एका अर्थाने आजची शिक्षण पद्धती म्हणजे रोजगार हमी योजना असून मुलांचा रेसकोर्स झाला आहे, अशी कडाडून टीका महाराष्ट्र भूषण डाॅ. अभय बंग यांनी येथे केली. संमेलनात शनिवारी मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाट आणि विवेक सावंत यांनी डाॅ. बंग यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी बंग यांनी रोखठोक भूमिका घेतली. सुमारे १५ ते २० कोटी लोकांना रोजगार देणारी ही इंडस्ट्री आहे. आजची शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करून त्यांना बैल म्हणून कामाला जुंपण्याचे काम करते. 'निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जगणे' असे विनोबा म्हणायचे. अगदी तसेच शिक्षण आता मिळत आहे. यातून बाहेर यायचे असेल तर विनोबा म्हणत त्याप्रमाणे जीवन हेच शिक्षण या सूत्राने शिक्षण घेतले पाहिजे, असे डाॅ. बंग यांनी सांगितले.
हेही वाचा :News : तामिळनाडूमध्ये साडी धोतर वाटप कार्यक्रमात गोंधळ, 4 महिलांचा मृत्यू