नागपूर - राष्ट्रीय जनसंपर्क दिनाच्या निमित्ताने पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने अनिल गडेकर यांना सर्वोत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गडेकर हे नागपूर विभागाचे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे पत्रकारिता. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारी किंवा एखाद्या संस्थेच्या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी महत्वाचे साधन म्हणजे जनसंपर्क. या जनसंपर्काचे अचूक आणि योग्य रीतीने काम करतो तो जनसंपर्क अधिकारी अर्थात पब्लिक रिलेशन ऑफिसर. त्यामुळेच २१ एप्रिल हा दिवस जनसंपर्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सर्वोत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून अनिल गडेकर यांचा सत्कार राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे औचित्य साधून पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर शाखा यांच्या वतीने नागपुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क क्षेत्रात सक्रिय योजनाबद्दल नागपूर विभागाचे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनिल गडेकर यांना सर्वोत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी अर्थात 'BEST PRO' या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र तसेच अनेक विभागातील जनसंपर्क अधिकारी व अनेक पत्रकार मंडळी उपस्थित होते.