नागपूर -पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे राज्यात आलेल्या टोळधाडींनी नागपूरसह विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. या कीटकांनी संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले आहे. ज्या भागात टोळधाडीचा हल्ला झाला आहे, त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहून टायरचा धूर केला, बँड वाजवला किंवा फटाके फोडले तर हा धोका कमी होऊ शकतो, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. टोळधाडीने शेकडो एकर वरील पीक फस्त केले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोळधाड असलेल्या भागात जाऊन पाहणी केली.