नागपूर -दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपूर शहरात स्फोटकांनी भरलेला एक बेवारस ट्रक आढळून आला आहे. हा ट्रक नव्याने तयार झालेल्या मेट्रोच्या डबल-डेकर पुलावर उभा असल्याचे दिसले. त्यामुळे घातपात घडवण्याचा कुणाचा हेतू तर नाही ना? अशा प्रश्नामुळे धाकधूक वाढू लागली. मात्र, ट्रक नादुरुस्त झाल्याने ट्रक चालक मेकॅनिकला शोधण्यासाठी गेला असल्याचे कळल्याने पोलिसांच्या जीवात जीव आला. सुमारे 4 तास चाललेल्या या थरार नाट्याने पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली.
असा घडला थरार...
राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवीन डबल-डेकर मेट्रो पुलावर स्फोटकांचा एक ट्रक संशयास्पद स्थितीत उभा आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे सर्वांची एकच धावपळ सुरू झाली. एक्सप्लोसिव्ह असे लिहिलेला ट्रक असल्याने पोलीस यंत्रणेला अलर्ट देण्यात आला. तोपर्यंत प्रताप नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ट्रकमध्ये कुणीही नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ट्रकच्या कॅबिनची झडती घेतली. तेथे ट्रक चालकाचा मोबाइल नंबर मिळाला. पोलिसांनी त्याला संपर्क केला.
चालकाचा फोन बंद झाल्याने पुन्हा खळबळ