नागपूर -यंदा राज्यभर जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सर्वच धरणे व तलाव तुडूंब भरलेले आहेत. नागपुरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावही पुर्णपणे भरला आहे. मात्र, या तलावाच्या सांडव्यांना अनेक ठिकाणी तडे गेल्याने धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब नागपूरकरांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. मात्र, प्रशासनाकडून याची कोणतीच दखल घेतली गेलेली नाही.
नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरीकडे पाहिले जाते. मात्र, याच अंबाझरी तलावाची सद्यस्थिती धोकादायक असल्याचे दिसते. तलावाच्या सांडव्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत, शिवाय अनेक भागात पडझडही झाली आहे. अंबाझरी तलावाची पाणी पातळी ही ८ टिएमसी असून तलावाची व्याप्ती ही २८ हेक्टर क्षेत्रात आहे. त्यामुळे तलावाच्या सांडव्याची सद्यस्थिती पाहता मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला व संबधित विभागाला वारंवार लक्षात आणून दिली गेली. मात्र, याची प्रशासनाकडून अद्यापही दखल न घेतल्याचे चित्र आहे.