नागपूरAjit Pawar On Nawab Malik : ''राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदारनवाब मलिक महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पहिल्यांदाच सभागृहात आले. मात्र, ते कोणत्या गटात आहेत, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर 'मी' या सर्वांवर प्रतिक्रिया देईन,'' असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अजित पवार यांना पत्र लिहून सत्ताधारी गटात नवाब मलिक यांचा समावेश करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळं नवाब मलिक सध्या तरी अजित पवार गटात असून नसल्यासारखे आहेत, हे अजित पवारांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येतंय.
"फडणवीस यांचं पत्र मला मिळालं आहे. नवाब मलिक यांची अधिकृत भूमिका काय आहे, हे समजल्यानंतर मी माझे म्हणणं मांडेन, विधानसभेत कोणाला कुठं बसवायचं, हे मी ठरवत नाही, तो निर्णय विधानसभाध्यक्ष घेतात" - अजित पवार, उपमुख्यमंत्री
'तो' निर्णय अध्यक्षांचा : पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "नवाब मलिक यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं. ते मी वाचलं आहे. नवाब मलिक काल पहिल्यांदाच सभागृहात आले. ते सभागृहात कुठे बसले, याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. त्या आगोदरच महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची भूमिका काय आहे? याबाबत मला माहिती नाही. त्यांचं मत ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत मांडेन." नबाव मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावरील खटला अजूनही सुरू आहे. सभागृहात कोणी कुठं बसावं, हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. नवाब मलिक यांनी ते कोणासोबत आहेत याबाबत अद्याप मत व्यक्त केलेलं नाही.