नागपूर -शेतकरी बांधवाना यंदाच्या हंगामात बियाणे खतांची कमतरता होणार नाही, असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. त्यांनी नागपुरातील बचत भवन येथे खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली. यात सहा जिल्ह्यांचा आढावा घेत महत्वाच्या विषयांवर चर्चा करत महत्वाच्या सूचना करण्यात आल्या.
माहिती देताना कृषी मंत्री दादाजी भुसे हेही वाचा -कोविडनंतर 'म्यूकरमायकोसीस' आजाराचा धोका; नागपुरात ४० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद
मागील वर्षात युरिया संदर्भात काही तुटवडा बाजारात असल्याचे पुढे आले. यंदाच्या हंगामासाठी दीड लाख मेट्रिक टन बफर स्टॉक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या संदर्भात अमलबजावणी होणार आहे. सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होणार नाही, असेही कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले.
यंदाच्या हंगामात प्रमुख्याने शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे, यासाठी मोहीम कृषी विभागाने राबवली आहे. यात सोयाबीनची उगवण क्षमता घरीच तपासून किती बियाणे एकरी वापरावे यासाठी मार्गदर्शन मोहीम कृषी विभागाने राबवली आहे. यासोबतच मध्यप्रदेशातून सोयाबीन मिळणार नाही, अशी चर्चा होती, पण त्याअनुषंगाने नियोजन झाले असून सोयाबीनचे बियाणे मिळणार असल्याची चर्चा झाली आहे, असे भुसे म्हणाले.
राज्य शासनाची सध्याची आर्थिक परिस्थिती बारी आहे. ही परिस्थिती राहण्यामागे शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे, हे सरकारने मान्य केले आहे. लॉकडाऊन असले तरी कृषी बियाणे कंपनी, कृषी दुकाने, कृषी काम यासर्व कामाला लॉकडाऊनमध्ये मुभा आहे. यासोबतच कृषी माल ग्राहकांपर्यंत कसा पोहचेल, यासाठी नियोजन केले जात आहे. कृषी पणन महसूल विभाग, ग्रामविकास हे एकत्रितपणे मालाची नासाडी होणार नाही, यासाठी नियोजन करत आहे. आजच्या बैठकीत अनेक विषय पुढे आले असून कर्ज संदर्भातसुद्धा आढावा घेण्यात आला आहे. कर्ज संदर्भातील धोरणावर मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सहकार मंत्री यांच्याशी या विषयावर चर्चा करून पुढील नियोजन केले जाईल, असेही भुसे म्हणाले.
हेही वाचा -नागपूर : वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या मुलाच्या घरी चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद