नागपूर - नागपूर महारानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. नागपुरातील संविधान चौकात एकत्र येत हे आंदोलन करण्यात आले. 'नागपूरच्या विकासासाठी तुकाराम मुंढेच हवे' अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचे तुकाराम मुंढे यांच्यामुळे धाबे दणानल्याने त्यांच्यावर आरोप करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर.. नागपूर महारानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी भाजप यांच्यातील वाद सर्वपरिचित आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांना वारंवार विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काही सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहेत. 'मीही तुकाराम मुंढे' अशा आशयाची टोपी घालून हे आंदोलन करण्यात आले. नागपूरचा विकास करायचा असेल तर आयुक्त तुकाराम मुंढेच हवे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सत्ताधारी भाजपकडून मुंढे यांना विरोध केला जात आहे. याचे कारण भाजप नेत्यांना विकास नाही तर राजकारण प्रिय आहे, असा आरोपही यावेळी आंदोलकर्ते वेदप्रकाश आर्य यांनी केला. या आंदोलनात भाजप विरोधात मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. त्याचबरोबर मुंढे यांच्या समर्थनार्थ विविध फलक ही झळकवण्यात आले. महापौर संदिप जोशी व त्यांचे नगरसेवक तुकाराम मुंढे यांना पदभार स्वीकारल्यापासून त्रास देत आहेत. एवढेच नाही तर मुंढे यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला.
तुकाराम मुंढे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांच्यामुळे नागपूर शहरातील अनेक विकास कामे झाली, सर्वसामान्यांना हक्काच्या बाबी मिळत आहेत. परंतु, सत्ताधाऱ्यांना हे पचन होत नाही. त्यामुळे ते मुंढे यांच्यावर खोटे आरोप करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आयुक्त मुंढे हे महारानगर पालिकेत आल्यानंतर त्यांनी महारानगर पालिकेचे लाखो रुपये वाचवले आहेत. सोबतच शहरातील कामांना गती देण्याचे काम तुकाराम मुंढे यांनी केले. मात्र, तरीही अशा अधिकाऱ्यांवर भाजप का आक्षेप घेत आहे? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात मुंढे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच भाजपने मुंढे यांना त्रास देणे थांबले नाही तर संपूर्ण शहरात आंदोलन केले जाईल, असा ईशाराही आंदोलनकर्ते देवप्रकाश आर्य यांनी दिला.