नागपूर -विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण राज्यभरात आशा वर्कर आणि गतप्रवर्तक कर्मचारी संघटनाच्यावतीने आंदोलन केले जात आहे. नागपूरच्या संविधान चौकात आयटक आणि सिटू या दोन कामगार संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.
या आहेत मागण्या -
आशा वर्कर आणि गतप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्ती द्या, कोविड 19 चा कामाचा मोबदला प्रति दिवस 300 रुपये विनाविलंब द्या, आरोग्य सेवा पदभरतीमध्ये आशा व गतप्रवर्तकांना 50 टक्के आरक्षण द्या, यासह अन्य काही मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात आशा वर्कर्सने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम केले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. मात्र, सरकारकडून आशा वर्कर्सकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संकटाची पर्वा न करता कोरोनाकाळात अविरतपणे सेवा देणाऱ्या आशा वर्कर्सला मानधन नाही, तर 21 हजार रुपये पगार देण्यात यावा, 50 लाखांचा विमा काढण्यात यावा, अश्या मागण्याही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या.