नागपूर -कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळत असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधित सर्व रुग्णांच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होत आहे. भविष्यात हा आकडा वाढू नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेक नाक्यावर डॉक्टरांचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. या दोनही राज्यातून हजारो लोक कामानिमित्त नागपूरला येतात. तसेच, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील अनेक प्रवासी नागपूरच्या विमानतळावर उतरतात. तेथून ते आपापल्या राज्यात परत जातात. अशा सर्वांची आरोग्य तपासणी आता जिल्ह्याच्या सीमेवरील चेक नाक्यावर केली जाणार आहे. इतर राज्यातील ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली असेल, त्यांच्यावर नागपूरलाच उपचार होतील. शिवाय, जे संशयित असतील त्यांनाही नागपूरलाच क्वारन्टाईन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे.