नागपूर -१ डिसेंबर रोजी होवू घातलेल्या शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची तयारी प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आहे. कोरोना बाबत विशेष खबरदारी घेत ही निवडणूक पार पडणार असल्याची माहीती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय ही निवडणूक कोरोनाच्या काळात असल्याने मतदारांनी देखील नियमांचे पालन करून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
2 लाखांहून अधिक मतदार -
सगळ्यांचे लक्ष लागलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारांबरोबरच प्रशासनासह सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीकरिता प्रशासन म्हणून केल्या जाणारी तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. या निवडणूकीत एकूण १९ उमेदवार आहेत. तर २ लाख ६ हजार ४५४ इतके मतदार आहेत. त्यामुळे मतदाना बाबतची नियमावली प्रत्येक मतदान केंद्रावर आणि शासनाच्या वेबसाईटवर दिल्याची माहितीही यावेळी आयुक्तांनी दिली.