नागपूर - दोन दिवसांपूर्वी शहरातील अजनी आणि बेलतरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गावगुंडांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने 20पेक्षा जास्त गाड्यांच्या काचा फोडून एका कारला आग लावल्याची घटना घडली होती. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला होता. ज्यामध्ये एका आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसून आला. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्यावरून पोलिसांनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार चिराग फुलकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने दारुच्या नशेत आणखी दोन मित्रांसह गाड्यांच्या काचा फोडल्याची कबुली दिली. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी अविष तायवाडे आणि रितेश डेकाटे नामक आरोपींना अटक केली आहे. तिन्ही आरोपी हे 19 वर्षांचे आहेत.
गेल्या काही वर्षांपासून उपराजधानी नागपुरातील गुंड आपली दहशत माजवण्याच्या उद्देशाने सामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच गुंडांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने या प्रकरणातील आरोपी चिराग फुलकर अविष तायवाडे आणि रितेश डेकाटे यांनी दोन दिवसांपूर्वी अजनी आणि बेलतरोडी या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाड्यांची तोडफोड करत एका कारला आग लावली होती. कार पेटवताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्यावरून पोलिसांना त्यांचा शोध घेणे शक्य झाले. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.