नागपूर -लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर पथकाने दुय्यम निबंधक कार्यालय हिंगणा येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपीक अलका रविन्द्र फेंडर यांना १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. जमिनीचे विक्री पत्र नोंदणीकृत करण्यासाठी अलका फेंडर यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती, मात्र तडजोडी अंती सौदा १५ हजारांवर पक्का झाला होता. या बाबत अँटी करप्शन ब्युरो कार्यालयात तक्रार दाखल झाल्यानंतर सापळा रचून वरिष्ठ लिपीक अलका रविन्द्र फेंडर करण्यात आली आहे.
पक्के विक्रीपत्र देण्याकरीता लाचेची केली मागणी -
या प्रकरणातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या पक्षकाराला महाजनवाडी वानाडोगरी तहसील हिंगणा येथील मोकळी जागा खरेदी करावयाची असल्याने त्यांच्याकडुन वकालतनामा लिहुन घेतला आहे. त्यांचे सदर खरेदी संबंधाचे सर्व काम तक्रारदार हे पाहत होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पक्षकार यांच्या वतीने मोकळी जागा विकत घेण्याचा सौदा करून त्याबाबत दोन्ही पक्षकार यांनी सांगितल्याप्रमाणे दस्तऐवज तयार केले. त्यानंतर ते दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अलका रविन्द्र फेन्डर यांना दिले असता त्यांनी तक्रारदार यांचे पक्षकार यांनी खरेदी केलेल्या जागेचे पक्के विक्रीपत्र नोंदणीकृत करून देण्याकरीता २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे.