नागपूर- उन्हाळा संपत आला आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ( Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University ) उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्याचबरोबर परीक्षा कोणत्या स्वरूपात होईल या संदर्भात देखील स्पष्टता न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची बैठक पार पडली होती. मात्र, त्यात परीक्षांबाबत तोडगा निघाला नव्हता आता उद्या (बुधवारी) पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये परीक्षांच्या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा पुढच्या महिन्यात सुरू होतील, अशी शक्यता आहे. मात्र, परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी ( Vice Chancellor Dr Subhash Chaudhary ) यांच्या भूमिकेकडे विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागले आहे. परीक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचा मानस हा विद्यापीठाचा असल्याने निर्णय जाहीर होण्यास उशीर होत असल्याचे बोलले जाते आहे.
प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू -एकीकडे राष्ट्रसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे नागपूर विद्यापीठावरही उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासंदर्भात दबाव वाढलेला आहे. त्यामुळेच नागपूर विद्यापीठ प्रशासनाने सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू केले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ- नागपूर विद्यापीठाने ऑफलाइन पद्धतीने उन्हाळी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला जाईल,त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा देताना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. मात्र, विद्यार्थी संघटनांकडून ऑनलाइन परीक्षांना कडाडून विरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन -नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात उशीर होत असल्याने मंगळवारी (दि. 17 मे) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती पुढे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात आश्वस्त केले होते. मात्र, त्यानंतरही अनेक दिवस लोटले असताना परीक्षा संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यातील इतर विद्यापीठांनी आपले वेळापत्रक जाहीर केले असून नागपूर विद्यापीठ अजूनही संभ्रमाच्या स्थितीत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ( ABVP ) महामंत्री प्रियंका वैद्य यांनी केला आहे.
हेही वाचा -Nagpur Orange Processing Issue : संत्र्याच्या 'कॅलिफोर्निया'त संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योगच नाहीत!