नागपूर - शहरातील बजाजनगर पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला नागपूर-भोपाळ मार्गावरील एका धाब्यातून अटक केली आहे. श्रीकांत जीवन निखाडे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने विकलेला तब्बल २० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलीस या चोरट्याला गेल्या दीड वर्षापासून शोधत होती. चोरटा या न त्या प्रकारे पोलिसांना हुलकावणी देत होता. शेवटी हा चोरटा पोलिसांना सापडला.
जुन्या चोरीचा छडा
गेल्यावर्षी आरोपी श्रीकांत निखाडे याने बाजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगेश शेंडे यांच्या घरी चोरी केली होती. चोरट्याने ४५५ ग्राम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. पोलिसांनी या प्रकरणात अमोल राऊत नावाच्या आरोपीला अटक केली होती. मात्र, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल श्रीकांत निखाडेकडे सोपवल्याची माहिती आरोपीने दिल्यानंतर पोलिसांनी श्रीकांतचा शोध सुरू केला होता. श्रीकांत हा कुही तालुक्यातील तितुर येथील रहिवासी असल्याने पोलिसांनी त्याच्या गावाकडे शोध सुरू केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून आरोपी हा लाखांदूर येथे ट्रक ड्रॉयव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग घेतला. परंतू तो त्यापूर्वीच तेथील काम सोडून दुसरीकडे पळून गेला होता.
पोलिसांनी पुन्हा त्याचा ठावठिकाणा शोधायला सुरवात केली, तेव्हा आरोपी श्रीकांत निखाडे हा सावनेर तालुक्यातील भोपाळ रोडवरील छत्रपूर येथे एका धाब्यावर काम करीत असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने श्रीकांत निखाडेला अटक केली.