नागपूर -शिक्षक मतदार संघ निवडणूक अत्यंत चुरशीची होईल या संदर्भात चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत मतभेद दिसून आले तर युतीतही सर्व आलबेल नसल्याचे समोर आले आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक महाविकास आघाडीकडून शिवसेना लढवेल असे निश्चित झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतोष इटकेलवार यांनी अर्ज दाखल केल्याने सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. तर आम आदमी पक्षाकडून देवेंद्र वानखेडे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.
महाविकास आघाडीत बिघाडीमहाविकास आघाडीत बिघाडीचा सूर उमटला आहे. नागपूरच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरच्या जागेवर आपला दावा सांगितला होता. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. ज्यामध्ये नागपूर विधानपरिषद निवडणूक यावेळी काँग्रेस ऐवजी उद्धव ठाकरे गटाकडून गंगाधर नाकाडे लढवणार आहेत, यावर निर्णय झाला आहे. काँग्रेसने नागपूरची जागा इच्छा नसताना सोडल्याचे नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले आहे. एकीकडे नागपूरची जागा उद्धव ठाकरे गट लढवणार हे निश्चित झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष इटकेलवार यांनी अर्ज दाखल केला आहे
भाजपचे मोठे नेते गायबनागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक भारतीय जनता पक्षाचा सहयोगी पक्ष शिक्षक परिषदेकडून लढवली जाते. मात्र, यावेळी नागो गाणार ऐवजी भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवाराने लढवावी अशी ईच्छा भाजपच्या मोठ्या नेत्यांची होती. मात्र, शिक्षक परिषदने चार महिन्यांपूर्वीच नागो गाणार यांची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपची गोची झाली. नागो गाणार यांना समर्थन देण्याशिवाय भाजपकडे पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे भाजप नेते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचा प्रत्यय आज नागो गाणार उमेदवारी अर्ज दाखल करताना आला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवनकुळे यांच्या उपस्थितीत नागो गाणार अर्ज दाखल करणार होते. मात्र ऐनवेळी बवनकुळे यांनी देखील दांडी मारल्याने नागो गाणार यांना भाजपच्या स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत अर्ज भरावा लागला.
नागो हॅट्रिक साधतील काविद्यमान आमदार नागो गाणार यावेळी हॅट्रिक करतील का असा प्रश्न गाणार समर्थकांमध्ये निर्माण झाला आहे. यावेळी महाविकास आघाडी निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवेल आणि नागो गाणार यांना घाम फोडेल अशी देखील चर्चा रंगली आहे.