नागपूर- कोरोना रुग्णाला ज्यावेळी घरा शेजारच्यांच्या आपुलकीची गरज असते त्यावेळी त्यांच्या तिरस्कारांच्या नजरांमुळे तो रुग्ण कोरोनावर मात करण्याची उमेद हरवून बसतो. मात्र, समाजात असे देखील काही अवलीये आहेत, ज्यांच्या नशिबी समाजाची नकारात्मकता आल्यानंतर त्यांनी यावर मात करत समजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. रेणुका खोडे असे या तरुणीचे नाव आहे. तिने आपल्या जिद्दीच्या जोरावर कमाल केली आहे.
पूर्व नागपूरच्या खरबी परिसरात राहणारी रेणुका खोडे ही तरुणी गेल्या महिन्याच्या १८ तारखेला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. रेणुकाला कोरोना झाल्याचे समजताच तिचे शेजारी, जिवाला जीव देणारे मित्र-मैत्रीण आणि समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला होता. ज्यांच्या भरवशावर जगण्याची उमेद असायची तेच आपल्याला टाळू लागल्यानंतर रेणुकाच्या मनात नकारात्मक विचारांची मांदियाळी सुरू झाली होती. त्याच वेळी रेणुकाच्या आईने दिलेला सल्ला तिला नकारात्मकतेच्या गर्ततेतून बाहेर पडण्यासाठी फार उपयोगी ठरला.