नागपूर- पोलिसांनी अफगाणी नागरिक समजून अफगाणिस्तानला परत पाठवलेला नूर मोहम्मद तालिबानी दहशतवादी असल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. याबाबत नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या समाज माध्यमांवर नूर मोहम्मदच्या नावावे वायरल होत असलेला फोटो हा त्याचाच आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे व्हायरल फोटोबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नूर मोहम्मदला भारतातून अफगाणिस्तानला परत पाठवल्यानंतर तो तिथे काय करतोय हे जाणून घेण्याची यंत्रणा आपल्याकडे नसल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा-तर तालिबानसोबत भारताने राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे'; माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा सल्ला
अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या संदर्भात जगातून चिंता व्यक्त होत असताना नागपूर पोलिसांना मात्र एका वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे. तब्बल दहा वर्षे नागपुरात लपून बसलेल्या नूर मोहम्मद नामक एका अफगाणी नागरिकाला नागपूर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तात परत पाठवले होते. मात्र, कालपासून (दि. 18 ऑगस्ट) तालिबानी सैन्यात सामील झाल्याचा दावा करणारा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नागपूर पोलीसांसह सुरक्षा यंत्रणांना घाम फुटला आहे. या संदर्भात नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तो फोटो नूर मोहम्मदचा आहे की नाही या संदर्भात शंका व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी स्पष्टपणे नकारही दिला नाही. त्यामुळे नागपुर पोलिसांनी ज्याला अफगाणिस्तानचा नागरिक म्हणून त्याच्या देशात पाठवले तो तालिबानी दशतवादी सिद्ध झाल्यास ही राष्ट्रीय सुरक्षेत फार गंभीर चूक ठरू शकते.
हेही वाचा-व्हिडिओ: तालिबान्यांची लूट सुरु, जागोजागी अशी करताहेत मौजमस्ती
तब्बल दहा वर्षे नागपुरात लपलेला होता नूर मोहम्मद
नूर मोहम्मद टुरिस्ट विसावर (प्रवासी) भारतात आला होता. मात्र, त्यानंतर तो कधीही अफगाणिस्तानला परत गेलाच नाही. तो नागपुरात आपली ओळख बदलून राहत होता. त्याने तब्बल दहा वर्षे नागपुरात घालवले. भारतात राहण्यासाठी नूर मोहम्मदने नागपूरचीच निवड का केली या प्रश्नाचे उत्तरही पोलिसांकडे नाही. नूर जेव्हा नागपूरला वास्तव्यास होता त्यावेळी त्याने नागपुरातील कोणत्या संवेदनशील स्थळांची रेकी केली होती का हे देखील स्पष्ट झालेले नाही.