नागपूर- नागपूर रेल्वे स्थानकावर ओव्हर हेड केबलला स्पर्श करून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना काल रात्री १०.३० च्या सुमारास घडली होती. सदर व्यक्ती रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या स्लिपर कोचवर चढला व त्याने ओव्हरहेड केबलला स्पर्श केले. त्याची पत्नीसुद्धा आत्महत्या करण्यासाठी डब्यावर चढली होती. मात्र, सुरक्षा रक्षकांनी कसे बसे तिला वाचवण्यात यश मिळविले. हा संपूर्ण घटनाक्रम रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर काही प्रवाशी आपल्या रेल्वे गाडीची वाट बघत होते. अचानक अरे धावा-धावा, वाचवा-वाचवा, ते दोघे आत्महत्या करत आहे अशा प्रकारच्या किंचाळ्यांनी नागपूर रेल्वे स्थानक थरारून गेले. ज्यांच्या नजरेत ही घटना पडली त्यांच्या मुखातून किंचाळ्या निघताच रेल्वे स्थानकावर उपस्थित सर्वांच्या नजरा ट्रेनच्या छताकडे रोखल्या गेल्या होत्या. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका विशेष गाडीच्या छतावर एक नव विवाहित जोडपे आत्महत्या करण्यासाठी चढले होते. या घटनेत बिरबल कुथ्थू पहारिया या तरुणाने ओव्हर हेड वायरला स्पर्श करून आत्महत्या केली. तर त्याची पत्नी ज्ञानदेवी थोडक्यात बचावली.
बिरबल आणि ज्ञानदेवी या दोघांनी प्रेम विवाह केल्यानंतर त्यांनी पळून जाऊन संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे सुमारे दहा दिवसांपूर्वीच या प्रेमीयुगुलाने घर सोडले. डोंगरगढला उतरल्यानंतर ते थांबले नंतर नागपूरला आले. दरम्यानच्या काळात त्यांनी सोबत आणलेले पैसे संपले. त्यामुळे त्यांना पोट भरणेही कठीण झाले होते. या दरम्यान बिरबल आणि ज्ञानदेवी हे दोघेही नागपूर ते डोंगरगढ आणि डोंगरगढ ते नागपूर असा प्रवास करीत होते. आता जगायचे कसे? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत होता. यातून दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला.