नागपूर - एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली महिला जिवंत असताना ती मृत झाल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने कुटुंबियांना दिल्याची घटना नागपूरमध्ये घडली. एवढेच नाही तर कोरोनाने मृत्यू झाल्याचे कारण देत मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले. हा धक्कादायक प्रकार नागपूरमधील आयजीपीए हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे शनिवारी घडला. या प्रकारानंतर कुटुंबियांनी महिलेला उपचारासाठी दुसरीकडे हलवले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, रूग्णालय प्रशासनाच्या चुकीच्या आणि अनागोंदी कारभारामुळे कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे कुटुंबियांनी हिंगणा पोलीस ठाण्यात रूग्णालया विरोधात तक्रार दिली आहे.
मृत्यूच्या माहितीने कुटुंब शोकाकुल -
नागपूरच्या काशीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला आयजीपीए हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये शुक्रवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. शनिवारी रूग्णालयातून मुन कुटुंबाला फोनद्वारे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली. महिलेचे निधन झाल्याचे कळताच कुटुंबात गोंधळ झाला आणि सर्वांनी शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली. रूग्णालयातून फोन येताच त्यांचा मुलगा अजयने रूग्णालयात धाव घेतली. यावेळी रूग्णालयाने मृतदेह व मृत्यू प्रमाणपत्र त्याला दिले. दरम्यान, रूग्णालयाने मृत महिलेचे दागिने कुटुंबियांना दिले. पण, ते दागिने आपल्या आईचे नसल्याचे अजयने सांगितले. त्यानंतर पॅकबंद असलेल्या मृतदेहाचा चेहरा दाखवण्यात आला. यावेळी मृत महिला आपली आई नसून दुसरीच असल्याचे अजयने सांगितले. तेव्हा रूग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला.
रूग्णालयात नेमके घडले काय -
महिलेला रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्या बेडवरील महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच बेडवर या महिलेला दाखल करून घेण्यात आले. यावेळी मृत महिलेच्या पेपर सोबत या पीडित महिलेचे पेपर अदली-बदली झाले. यामुळे चुकून त्यांच्याच नावाने डेथ सर्टिफिकेट बनवण्यात आले. त्याच पेपरवरील मोबाइल नंबरवर रूग्णाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.