नागपूर -रेल्वेच्या रुळावर चालताना इअरफोन्स लावून गाणी ऐकणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील छिंदवाडा मार्गावर घडली. यश गढवाल (वय २२)असे या तरुणाचे नाव आहे. तो रेल्वे रुळावर चालत असताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत होता. त्याच वेळी पाठी-मागून आलेल्या रेल्वेचे हॉर्न त्याला ऐकू आले नाही. त्यामुळे रेल्वे यशला धडक देऊन पुढे निघून गेली. या अपघातात यशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
यश गढवाल आपल्या कुटुंबासह सावनेर येथे राहत होता. तो बॅनर आणि होर्डिंग लावण्याचे काम करत असे. काल संध्याकाळी तो रेल्वे रुळावर फिरत असताना मागून आलेल्या रेल्वेने त्याला जोरदार धकड दिली दिली. या अपघातापूर्वी लोको पायलटने गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न करत अनेक वेळा हॉर्नदेखील वाजवला मात्र, त्याचा काहीही उपायोग झाला नाही. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.