नागपूर - उपराजधानी नागपूरात एका 98 वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. प्रभाकर शुक्ला असे या आजोबांचे नाव आहे. ते खामला भागातील रहिवासी आहेत. काल रात्री त्यांना खासगी रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रचंड अशक्तपणा आणि इतर व्याधी असताना सुद्धा या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देताना रुगणालयाने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आहे. ज्यामुळे त्या आजोबांचे डोळे देखील पाणावले.
प्रभाकर शुक्ला नामक या आजोबांना गेल्या महिन्यात म्हणजेच 10 ऑक्टोबरला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना तापासह श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
आजोबांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल येताच, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्रास वाढतच असल्याने डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. आयसीयूमध्ये सात दिवस उपचार घेतल्यानंतर या 98 वर्षीय आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना इतर कुठलाही त्रास जाणवत नसल्याने त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. ते घरी जायला निघाले तेव्हा डॉक्टरांसह रुगणालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.