नागपूर- गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात हत्यांचे सत्र थांबतच नसल्याचे चित्र आहे. १२ दिवसात ८ हत्येच्या घटनांनी उपराजधानी हादरली आहे. नवीन वर्षात नागपूर जिल्ह्यातील हत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाही. कारण, रविवारी रात्री काही मिनिटांच्या अंतरावर जिल्ह्यात पुन्हा दोन हत्याकांड घडले. केवळ १२ दिवसात नागपूर जिल्ह्यात ८ हत्येच्या घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपुरात १२ दिवसात ७ हत्या झाल्या. याबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी पहिली घटना नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत झिंगाबाई टाकळी परिसरात घडली आहे. या घटनेत ललित खरे नावाच्या तरुणाची परिसरातील मराठी शाळेजवळ धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. मद्यपान केल्यानंतर झालेल्या भांडणातून ही हत्या झाली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून जवळच असलेल्या मानकापूर क्रीडा संकुलात ग्रामीण पोलीस दलाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना व त्या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित असताना ही घटना घडली आहे. दुसरी घटना जिल्ह्यातील सावनेरमध्ये घडली आहे. अंगद सिंह नावाच्या जिम संचालकाला सत्तूर/मोठ्या चाकूने वार करून जिवे मारण्यात आले. ऑक्सिजन जिमचे संचालक असलेले अंगद सिंग यांच्यावर रात्री ९ च्या सुमारास सावनेरमधील नागोबा मंदिरा जवळ हल्ला झाला आणि त्यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली.
हेही वाचा-'ही' सभ्यता नरेंद्र मोदी कधी शिकणार..काँग्रेसची 'त्या' लेखकाविरुद्ध पोलिसांत तक्रार
नागपुर जिल्ह्यात १२ दिवसात आठ हत्या
१) ४ जानेवारी- नागपूर शहरातील अजनी परिसरात महेश पोरंडवार यांची डोक्यावर हातोडीने वार करून हत्या करण्यात आली. हत्येच्या आरोपाखाली पत्नीला अटक करण्यात आले.
२) ६ जानेवारी- कन्हान गावात स्थानिक शिवसेना नेत्याच्या नातेवाईकाची गौरव बारमध्ये हत्या करण्यात आली. गुन्हेगारी वृत्तीच्या तीन आरोपींनी संजू खडसेला चाकूने भोसकून मारले.
३) ७ जानेवारी- नागपूर शहरातील कांजी हाऊस चौकात समीर शेख उर्फ बाबू या गुन्हेगाराची आर.के सावजी या हॉटेलमध्ये सर्वांच्या देखत हत्या करण्यात आली. परिसरातील गुन्हेगारांच्या दुसऱ्या टोळीने पाठलाग करून आणि घेरून ही हत्या केली.
४) ७ जानेवारी- नागपूर शहरातील वाठोडा परिसरात गंगा सेलिब्रेशन हॉल समोर अनोळखी मजुराची काही स्थानिक गुन्हेगारांनी दगडाने ठेचून हत्या केली.
५) ७ जानेवारी- नरखेड गावात विनोद नारनवरे यांना सिमेंट रस्त्यावर डोके आपटून आपटून जखमी केले गेले. नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
६) ९ जानेवारी- काचूरवाही गावात शेतामध्ये अशोक वाडीभस्मे याचे मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळले.
७) १२ जानेवारी- ललित खरे नावाच्या इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झिंगाबाई टाकळी परिसरात ही घटना घडली होती.
८) १२ जानेवारी- सावेनर येथे जिम संचालक असलेल्या अंगद सिंग नावाच्या इसमाची धारधार हत्याराने खून करण्यात आला.