नागपूर - नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात तब्बल ११३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये २२ मार्च रोजी सर्वाधिक ४० तर २३ मार्चला ३३ रुग्ण कोरोनावर उपचार घेताना दगावल्याचे निष्पन्न झाले आहे. तर २४ मार्च रोजी सुद्धा ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आल्याने नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती किती भीषण झालेली आहे याचा अंदाज येईल. नागपुरात मृत्यूच्या वाढलेल्या आकड्यांमुळे सामान्य नागपूरकरांसोबतच प्रशासनासाठी देखील अत्यंत चिंता वाढलेली आहे. नागपूरात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे, त्या तुलनेत मृत्यू देखील होत आहेत. या मागील नेमकं कारणे काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.
नागपूरकरांनो आता तरी सावध व्हा.. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तीन दिवसात ११३ रुग्णांचा मृत्यू - नागपूर कोरोना
नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात तब्बल ११३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये २२ मार्च रोजी सर्वाधिक ४० तर २३ मार्चला ३३ रुग्ण कोरोनावरील उपचार घेताना दगावल्याचे निष्पन्न झाले आहे. तर २४ मार्च रोजी सुद्धा ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आल्याने नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती किती भीषण झालेली आहे याचा अंदाज येईल.
लक्षणं अंगावर काढणे धोकादायक -
लोकांमध्ये कोरोना बद्दल भीती उरलेली नसल्यामुळे हा आकडा वाढत असल्याचे चित्र नागपुरात बघायला मिळत आहे. याशिवाय नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर देखील सुरुवातीचे काही दिवस औषधोपचार करून घरीच राहण्याला नागरिक प्राधान्य देतात. ज्यावेळी तब्येत जास्त खालावते तेव्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतला जातो. मात्र दुर्दैवाने तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे नागपुरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे वाढत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे.