नागपूर- ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आजचा तिसरा दिवस अनेक कारणांनी खास ठरणार आहे. आजची संमेलनाची सुरुवात नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेने सादर केलेल्या 'मोमोज' या एकांकिकेने होईल. यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या खुल्या रंगमंचावर एकपात्री नाटकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
सकाळी 'संमेलनाची वारी १ ते ९९' हा खास कार्यक्रम सादर केला जाईल. यामध्ये नाट्य परिषदेची नागपूर शाखा गेल्या ९९ वर्षातील नाट्य संमेलनाचा मागोवा घेणारा कार्यक्रम सादर करेल. तसेच गेल्या ९९ वर्षातील नाट्य संमेलनाध्यक्षांनाही अनोख्या पध्दतीने मानवंदना देण्यात येईल.
दुपारी एक वाजता 'मराठी रंगभूमी - पुणे मुंबई पुणे' या विषयावर खास परिसंवादाच आयोजन करण्यात आलंय. यात अनेक नामवंत कलाकार सहभागी होऊन आपली मतं मांडतील. दुपारी २ वाजता लेखक शाम पेठकर आणि दिग्दर्शक हरीश इथापे शेतकऱ्यांच्या विधवा सुनांच्या लेकीचं म्हणणं मांडणारा 'तेरव' हा अनोखा नाट्य अविष्कार सादर करतील. हे आजचं सगळ्यात महत्त्वाचं सादरीकरण ठरणार आहे. दुपारी ४ वाजता कोल्हापूरच्या वारणानगरमधील लहान मुलं 'गीत रामायण' हा खास कार्यक्रम सादर करतील. तर त्यानंतर खुले अधिवेशन आणि समारोपाचा औपचारिक कार्यक्रम रंगेल.
रात्री साडेनऊ वाजता आनंदवनातील मुलं 'स्वरआनंदवन' वाद्यवृंद सादर करतील. तर मध्यरात्री १ वाजता देवकी पंडित यांच्या मुक्ती या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे अनेक संतांच्या रचना नव्या रुपात ऐकायला मिळतील. ताल सुरांच्या साथीने या नाट्य संमेलनाचा पडदा पडेल तो शतकोस्तवी संमेलनात पुन्हा उघडण्यासाठीच.