नागपूर- गेल्या 4 दिवसांपासून शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच होती. मात्र, आज काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाल्याचे बघायला मिळाले. नागपुरात काल (9 ऑगस्ट) दिवसभरात ३७४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे, नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८ हजार ७८० इतकी झाली आहे. यामध्ये १२४ रुग्ण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत.
एकूण रुग्ण संख्येपैकी २ हजार ७०० रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील आहेत. तर ६ हजार ८० रुग्ण नागपूर शहरातील आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या ३७४ रुग्णांपैकी ५९ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत, तर ३२४ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, ज्यात त्यांचा कोरोना अवहाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर आज १४६ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे, नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ हजार ६९२ इतकी झाली आहे. शिवाय आज २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे, कोरोनामुळे नागपुरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा ३१५ इतका झाला आहे. महत्वाचे म्हणजे, ३१५ पैकी २६८ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत, तर ४७ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या नागपुरातील २८ ठिकाणी ३ हजार ७७३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५३.४३ टक्के इतके आहे, तर एकूण मृत्यू दर हा ३.६० टक्के इतका आहे. शिवाय मूळचे नागपुरातील असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी ३.०५ इतकी आहे.
हेही वाचा-कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला जेव्हा मनपा आयुक्त फोन करतात तेव्हा...