नागपूर- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात रविवारी (दि. 21 जून) दिवसभरात 32 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1 हजार 298 वर पोहोचला आहे. रविवारी पॉझिटिव्ह आलेले बहुतांश रुग्ण पाचपावली येथील विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले आहेत.
नागपुरात कोरोनाच्या नव्या 32 रुग्णांची नोंद आढळलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने प्रशासनाने त्यांना आधीच क्वारंटाइन केले असल्याची माहिती आहे. या शिवाय उपचारात असलेल्या 38 रुग्णांचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
नागपुरातील 862 रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन ठणठणीत बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 19 रुग्णांचा नागपुरात मृत्यू झाला आहे. त्यापैकी 6 रुग्ण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. सध्या नागपुरात 417 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर मेयो, मेडिकल, एम्स आणि कामठी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या शिवाय नागपुरात सध्या कोरोनाबाधित रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाण 66 टक्क्यांवर आले आहे. तर नागपुरातील मृत्यू दर 1.46 टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नव्याने रुग्ण वाढत आहेत. रविवारी (दि. 21 जून) 3 हजार 870 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर 1 हजार 59 रुग्णांनी रविवारी (दि. 21 जून) कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865 नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75 नमुने पॉझिटिव्ह (17.6 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 287 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
हेही वाचा -दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक, नागपूर पोलिसांची कारवाई