नागपूर - 'एक घर एक सीसीटीव्ही' उपक्रम राबवण्याची नागपूर पोलीस तयारी करीत आहेत. नागरिकांच्या सहयोगाने शहरातील घरांवर ३ लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. या योजनेला 'ऑपरेशन थर्ड आय' असे नाव देण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने अनेक वेळा तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी नागपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले, पण ती यंत्रणा आता अपुरी ठरत असल्याने घरोघरी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. ३ लाख सीसीटीव्ही बसवण्याची जबाबदारी ३३ पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे.